भाषिक शुद्धतेचे महत्त्व आणि स्वरूप

भाषा आणि प्रमाण-भाषा

लेखक अरुण फडके, दिनांक August 27, 2004 · 23 mins read

भाषिक शुद्धतेचे महत्त्व आणि स्वरूप

भाषा आणि प्रमाण-भाषाा

‘भाष्‌’ म्हणजे ‘बोलणे’ ह्या संस्कृत धातूपासून ‘भाषा’ हा स्त्रीलिंगी शब्द तयार झाला. “मनातील विचार आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी मुखावाटे निघालेल्या ध्वनींचा सार्थ समूह म्हणजे भाषा.”- अशी भाषेची व्याख्या प्र. न. जोशी ह्यांनी त्यांच्या ‘सुबोध भाषाशास्त्र’ ह्या पुस्तकात केली आहे. ह्या गोष्टी पाहिल्यावर असे दिसते की, भाषेचा मुख्य संबंध ‘बोलणे’ ह्या क्रियेशी आहे. पूर्वीच्या काही विशिष्ट काळापर्यंत ही गोष्ट खरी असली, तरी आज मात्र ती तशी आहे असे म्हणणे किंवा मानणे योग्य होणार नाही. अलीकडच्या काळातील इंग्लिश कोशांमध्येसुद्धा भाषेच्या व्याख्येत ‘लिहिणे’ ह्या क्रियेचा उल्लेख केलेला आढळतो. आजच्या युगात भाषा ही केवळ मुखावाटे निघणारी गोष्ट राहिलेली नसून अनेक माध्यमांद्वारे ती संपूर्ण जगात पसरत आहे. ही परिस्थिती केवळ मराठी ह्या भाषेलाच लागू पडते असे नाही. जगातील अनेक भाषा आज जगभर पसरत आहेत. कोणत्याही भाषेचे संपर्कक्षेत्र जेव्हा हळूहळू वाढत जाऊ लागते, तेव्हा तिचे स्वरूप केवळ तोंडी किंवा बोली न राहता, ती भाषा लिखित स्वरूपात येते. कालांतराने ही भाषा फार मोठ्या लोकसंख्येची संपर्काची भाषा होते. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय व्यवहारामध्ये तिचा वापर होऊ लागतो. शिक्षणाचे माध्यम म्हणून ती वापरली जाऊ लागते. समाजातील बहुधा सर्व गट आपल्या लेखनव्यवहारासाठी तिचा वापर करू लागतात. अशा रितीने फार मोठ्या समाजाकडून विविध उद्दिष्टांसाठी वापरली जाणारी, आणि जिच्या लेखनातही अनेक बाबींमध्ये ठिकठिकाणी एकसूत्रता किंवा एकवाक्यता आढळते, अशी भाषा म्हणजेच प्रमाण-भाषा होय.

शुद्धलेखन म्हणजे काय?

भाषा ही प्रवाही आणि परिवर्तनशील अशी गोष्ट आहे. ती बोली स्वरूपात असते तेव्हाही तिच्यात बदल होत असतात, आणि ती लेखी स्वरूपात येते तेव्हाही तिच्यात बदल होत असतात. हे बदल अपरिहार्य आणि आवश्‍यक असतात हे जेवढे खरे, तेवढेच हेही महत्त्वाचे की, ह्या बदलांची दिशा योग्य असली पाहिजे. भाषा जेव्हा केवळ बोली रूपात असते, तेव्हा तिच्या शब्दरूपांत आणि शब्दार्थांमध्ये खूप बदल होत असतात, हे बदल भराभर होत असतात, आणि ह्या बदलांमध्येही ठिकठिकाणी भिन्नता असते. म्हणूनच बोली भाषेची अनेक रूपे तयार होतात आणि त्या रूपांना ‘वर्गभाषे’चे किंवा ‘प्रांतीय भाषे’चे स्वरूप येते. पुढे भाषेच्या विकासात तिला वर म्हटल्याप्रमाणे ‘प्रमाण-भाषे’चे स्वरूप प्राप्त होते. आता तिच्यात होणाऱ्या बदलांचे प्रमाण कमी झालेले असते, त्यांचा वेगही कमी झालेला असतो, आणि ह्या बदलांमध्ये ठिकठिकाणी एकसूत्रता किंवा एकवाक्यता आढळते. तरीही ही एकसूत्रता अजूनपर्यंत सर्व बाबींमध्ये आलेली नसते आणि सर्व ठिकाणी पोचलेली नसते. त्याचबरोबर ही प्रमाण-भाषा जेव्हा शिक्षणाचे माध्यम म्हणून वापरायची असते तेव्हा प्रत्यक्ष ‘भाषा’ हा विषय, म्हणजेच त्या भाषेचे स्वरूप, हे नवीन पिढीला शिकवताना ते सर्व ठिकाणी सारखेच शिकवले जाणे आवश्‍यक असते. त्याचप्रमाणे ह्या भाषेतून इतर विषयांचे लेखन ठिकठिकाणच्या लेखकांकडून होणार असते. त्यामुळे ह्या लेखनातही एकसूत्रता असणे आवश्‍यक असते. ह्या गरजेपोटी आता समाजातील काही व्यक्ती एकत्र येऊन, चर्चा करून प्रमाण-भाषेच्या लेखनाचे काही नियम ठरवतात. भाषेत वापरले जाणारे शब्द ठिकठिकाणी कसे वापरले जात आहेत, त्यांच्या रूपांमध्ये कोणत्या प्रकारचे भेद दिसत आहेत, ह्या शब्दांची रूपे काळानुरूप कशी बदलत गेली आहेत, बोली रूप आणि लेखी रूप ह्यांमध्ये काय भिन्नता आहे, नवीन आलेले किंवा येणारे शब्द लिहिण्याची प्रवृत्ती काय आहे, परभाषेतले शब्द स्वीकारताना ते कोणत्या पद्धतीने लिहिले जात आहेत, ह्या एकंदर प्रक्रियेत काही सूत्रे आहेत का, आणि ह्या गोष्टी विशिष्ट पद्धतीने घडण्यामागे काय कारणे आहेत; अशा अनेक बाबींचा विचार हे नियम ठरवताना केला जातो. ह्या निरीक्षणातून आणि विचारमंथनातून त्या भाषेचा काही विशिष्ट स्वभाव किंवा तिची विशिष्ट प्रकृती समोर येते आणि मग त्याला अनुसरून तिच्या लेखनाचे काही नियम ठरवले जातात. म्हणजेच, आधी समाजाकडून ती भाषा लिहिली जाते आणि नंतर त्या लेखनाचे निरीक्षण करून त्याच लेखनाचे नियम ठरवले जातात. ज्या शब्दांमध्ये किंवा शब्दरूपांमध्ये अजूनपर्यंत एकसूत्रता किंवा एकवाक्यता आलेली नाही अशा शब्दांचे नियमन करण्यासाठी हे नियम जसे आवश्‍यक असतात, तसेच भविष्यात भाषेत नव्याने येणाऱ्या किंवा तयार केल्या जाणाऱ्या शब्दांचे नियमन करण्यासाठीही हे नियम आवश्‍यक असतात. ह्या नियमांनुसार किंवा हे नियम पाळून केले जाणारे लेखन म्हणजेच ‘शुद्धलेखन’ होय.

भाषिक शुद्धतेचे महत्त्व

मानवाची भाषा हे त्याच्यासाठी मुख्यतः संपर्काचे एक साधन आहे. त्यामुळे संपर्क साधण्याचे उद्दिष्ट सफल झाले की, भाषेचे काम संपले असा भाषेकडे पाहण्याचा एक संकुचित दृष्टिकोन असतो. भाषेचे हे उद्दिष्ट साध्य करून घेण्यासाठी शुद्धलेखनाची फारशी गरज लागत नसल्याने शुद्धलेखनाचे महत्त्व बहुसंख्य व्यक्तींच्या लक्षात येत नाही किंवा त्यांच्याकडून ते लक्षात घेतले जात नाही. परंतु आजच्या काळात ज्या भाषा केवळ ‘संपर्काचे साधन’ एवढ्या उद्दिष्टापुरत्या राहिलेल्या नसून, ज्ञाननिर्मिती आणि ज्ञानप्रसार ह्यांचे एक प्रमुख साधन म्हणून त्यांचा वापर केला जातो, अशा प्रगत भाषांच्या बाबतीत एवढा संकुचित दृष्टिकोन बाळगून चालत नाही, चालणार नाही. मराठी ही अशा प्रगत भाषांपैकी एक भाषा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. शुद्धलेखनामध्ये ऱ्हस्व-दीर्घाच्या अनेक चुका अनेक व्यक्तींकडून घडत असल्यामुळे शुद्धलेखन म्हणजे ऱ्हस्व-दीर्घ असा गैरसमज होणे स्वाभाविक आहे. आधी सांगितलेला संकुचित दृष्टिकोन आणि हा गैरसमज ह्या दोन गोष्टींमुळे बहुतेकांना असे वाटते की, ऱ्हस्व-दीर्घ चुकले तरी ‘संदर्भाने’ अर्थ समजतो, अर्थ समजल्यामुळे ‘संपर्क’ हे उद्दिष्ट साध्य होते. मग ऱ्हस्व-दीर्घ पाळायची, म्हणजेच शुद्धलेखन पाळायची, एवढी गरज काय. त्याचे एवढे महत्त्व ते काय.

परंतु शुद्धलेखन म्हणजे केवळ ऱ्हस्व-दीर्घ नव्हे. अनुस्वार, सामान्यरूप, अनेकवचन, जोडाक्षर, विसर्ग, रफार, शब्दसिद्धी, विरामचिन्हे, वाक्यरचना अशा इतर अनेक बाबींचा अंतर्भाव शुद्धलेखनात होतो. शुद्धलेखनाला फारसे महत्त्व न देता ते पाळायचे नाही असे ठरवून ह्यांतील प्रत्येक बाबतीत प्रत्येकाने स्वतःच्या मर्जीप्रमाणे किंवा ज्ञानाप्रमाणे लेखन केले, तर अनेक शब्दांचे अर्थ बदलतील, अनेक निरर्थक शब्द समोर येतील, वाक्यातील अनेक घटकांचा एकमेकांशी योग्य तो समन्वय न साधला गेल्यामुळे विरुद्धार्थी, द्य्वर्थी किंवा निरर्थक वाक्ये तयार होतील. आणि मग प्रत्येक वाक्यात ‘केवळ संदर्भाने’ ह्या सगळ्याचा योग्य तो अर्थ लावत बसायची वेळ आली तर ‘संपर्क’ हे किमान उद्दिष्ट साध्य होणेही दुर्लभ होईल. कपड्यांमधील नीटनेटकेपणा ज्याप्रमाणे कपड्यांचे सौंदर्य वाढवत असतो, त्याप्रमाणेच भाषेतील शुद्धता ही त्या भाषेचे सौंदर्य वाढवत असते.

भाषिक शुद्धतेचे सद्यःस्वरूप

मराठी साहित्य महामंडळाने 1961 साली 14, आणि 1972 साली 4 असे मराठी शुद्धलेखनविषयक एकूण 18 नियम केले. महाराष्ट्र शासनाने ह्या नियमांना मान्यता दिली आणि शिक्षणासह सर्वच क्षेत्रांमध्ये ह्या नियमांनुसार लेखन व्हावे असे जाहीर केले. ह्या गोष्टीला आज कमाल 43 व किमान 32 वर्षे झाली. परंतु इयत्ता पाचवी ते दहावी ह्या इयत्तांमध्ये दिले जाणारे मराठी भाषेचे शिक्षण पाहिले, तर असे दिसते की, ह्यांतील निम्मे नियमसुद्धा विद्यार्थ्यांना पूर्णपणे शिकवले जात नाहीत. दहावीच काय, पण मराठी घेऊन एम.ए. होईपर्यंतसुद्धा हे सर्व नियम तपशिलात शिकवण्याची सोय आपल्या अभ्यासक्रमात नाही. त्यामुळे गेल्या सुमारे 40 वर्षांमध्ये ज्या व्यक्तींनी शिक्षण घेतले त्या सर्वांचे मराठी शुद्धलेखनाचे ज्ञान अर्धवट असण्याची शक्यताच अधिक. अर्थात ह्यात त्या व्यक्तींचा काही दोष नसला, तरी ह्या परिस्थितीच्या दुष्परिणामांचा त्रास मात्र आज सगळ्यांनाच होत आहे. ह्यांतीलच काही व्यक्ती पुढे शिक्षक किंवा प्राध्यापक झाल्या आहेत. त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या काळात शुद्धलेखन पूर्णपणे आणि नीट न शिकवले गेल्यामुळे साहजिकच आज तेही त्यांच्या विद्यार्थ्यांना हा विषय नीट शिकवू शकत नाहीत. एवढा मोठा काळ ह्या गोष्टीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होऊनही आजसुद्धा, शिक्षण किंवा शुद्धलेखन ह्या क्षेत्राशी संबंधित असलेली कोणतीही शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी जबाबदार संस्था ह्या गोष्टीकडे लक्ष देण्यास उत्सुक दिसत नाही.

बालवयात मुलांना आपल्या भाषेच्या लिखित स्वरूपाची प्राथमिक ओळख करून देण्यासाठी म्हणून आपण जेव्हा त्यांना आपली स्वरमाला शिकवतो, अगदी तेव्हापासूनच आपण त्यांना आपल्या भाषेचे अयोग्य आणि अपूर्ण शिक्षण देण्यास सुरुवात करतो. बहुतेक सर्वच शाळांमध्ये ‘अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः’ ही अक्षरे आपली स्वरमाला म्हणून शिकवली जातात. वास्तविक पाहता ह्यांतील ‘अं’ आणि ‘अः’ हे स्वर नसून ते स्वरादी आहेत. त्या बालवयात केवळ ‘अं’ आणि ‘अः’ शिकायचे नसून हे शिकायचे असते की ‘अनुस्वार’ आणि ‘विसर्ग’ ही चिन्हे कोणत्याही अक्षराच्या बाराखडीतील प्रत्येक अक्षरावर देता येतात. मोरो केशव दामले ह्यांच्या ‘शास्त्रीय मराठी व्याकरण’ ह्या पुस्तकात ‘प्रचलित स्वरमाला’ म्हणून ही अयोग्य स्वरमाला दाखवली असून ‘शास्त्रीय स्वरमाला’ म्हणून पुढील स्वरमाला दाखवली आहे- अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, औ. ही स्वरमाला पुढे इयत्ता चौथीत जी मुले शिष्यवृत्ती परीक्षेला बसतात त्यांनाच सांगितली जाते. बाकीच्या विद्यार्थ्यांना मात्र ही अयोग्य स्वरमालाच माहीत असते. स्वरमाला शिकवण्याच्या बाबतीत असा भेदभाव असण्याचे काहीच कारण नाही.

ही शास्त्रीय स्वरमाला शैक्षणिक आयुष्यात कधीच न शिकल्यामुळे नंतर येणारी अडचण पुढील स्वरूपाची असते- ‘कृपा, गृह, घृणा, तृष्णा, दृष्टी, नृप, पृथ्वी, मृग, वृष्टी, शृंगार, सृष्टी, हृदय’ ह्यांसारखे ‘ऋ’ हा स्वर मिसळलेले शब्द काही कारणाने शब्दार्थकोशात पाहायची वेळ आली तर ते कुठे सापडतील हे भल्याभल्यांना सांगता येत नाही. अशास्त्रीय स्वरमालेत ‘ऋ’ हा स्वर नसल्याने त्याचा क्रम ‘ऊ’ ह्या स्वरानंतर आहे एवढे मूलभूत ज्ञानच मिळालेले नसते. त्यामुळे हे शब्द त्या-त्या अक्षरातील दीर्घ उकारांच्या शब्दांनतर मिळतील हे समजत नाही. त्याऐवजी ते संबंधित औ-कारानंतर येणाऱ्या जोडाक्षरांमध्ये शोधले जातात आणि तिथे ते न मिळाल्याने निराशा तर होतेच, पण त्या कोशाबद्दलही अकारणच वाईट मत होण्याची शक्यता असते.

‘ऋ’ ह्या स्वराचा उच्चारही ‘रु’ किंवा ‘रू’ ह्या अक्षरांच्या उच्चारांपेक्षा वेगळा आहे आणि तोही क्वचितच काही शिक्षकांना माहीत असतो. ह्या अक्षरांच्या उच्चारांत फरक आहे हे आपल्या शिक्षणात सांगितले जात नसल्यामुळे ‘कृष्ण हा शब्द क्रुष्ण असा लिहिला तरी चालतो का’ अशा प्रकारचे मूलभूत प्रश्नसुद्धा शिक्षक आणि पालक ह्यांच्याकडून विचारले जातात किंवा कित्येकांच्या मनात असतात.

जी गोष्ट स्वरमालेची तीच गोष्ट आपल्या व्यंजनांचीसुद्धा. क ते ळ ह्या 34 व्यंजनांमधील विशेषतः ‘ङ्, ञ्‌, श्‌, ष्‌’ ह्या चार व्यंजनांचे उच्चार बहुतेक शाळांमध्ये नीट शिकवले जात नाहीत. शिक्षकसुद्धा ह्याच शिक्षणपद्धतीतून शिकलेले असल्यामुळे मुळात शिक्षकांनासुद्धा हे उच्चार नीट येत असतातच असे नाही. त्यामुळे ह्या व्यंजनांचे योग्य उच्चार विद्यार्थ्यांपर्यंतही पोचवले जाऊ शकत नाहीत.

एकंदरीतच आपल्या वर्णमालेशी असलेला संपर्क इयत्ता चौथीनंतर एकदा तुटला की पुढील शिक्षणात तो पुन्हा जोडण्याची संधी ‘पर-सवर्ण’ आणि ‘संधी’ शिकवताना वारंवार येऊनही आपल्या विचित्र अभ्यासक्रमामुळे ही गोष्ट होऊ शकत नाही. शाळेतल्या तुकड्यांची नावे तसेच प्रश्नपत्रिकेतील उपप्रश्नांमागे किंवा एखाद्या पुस्तकातील मुद्द्यांमागे घालावयाची अक्षरेसुद्धा ‘क, ख, ग, घ’ ह्या क्रमाने नसून ‘अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह’ अशा विचित्र इंग्लिश क्रमाने घातलेली असतात. त्यामुळे आपली वर्णमाला आपल्यासमोर वारंवार येत नाही. परिणामी कालांतराने ह्या वर्णमालेचा विसर पडत आहे आणि त्याचा दुष्परिणाम पुढीलप्रमाणे होत आहे.

शिक्षणक्षेत्रात कोशवाङ्मयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु आपल्याकडे मात्र हे महत्त्व म्हणावे तेवढे ओळखले गेलेले दिसत नाही. मुळात कित्येक विद्यार्थी आणि शिक्षक ह्यांच्या घरी मराठी शब्दार्थकोश असतोच असे नाही. असला तरी आपली वर्णमाला (अ ते ज्ञ) त्यांना पाठ नसल्यामुळे तो पाहता येत नाही. त्यामुळे शब्दांच्या योग्य लेखनाबद्दल कोशात दिलेली माहिती त्यांच्याकडून कधी पाहिलीच जात नाही आणि मग अंधानुकरणाने लिहीत गेल्यामुळे आपोआपच अयोग्य लेखनाची रूढी निर्माण होत आहे.

आपल्या लिपीत आपण जी चिन्हे वापरतो त्यांपैकी रफार (र्प), रकार (प्र) आणि ऋकार (पृ) ह्या चिन्हांबद्दलची नीट माहिती सुशिक्षितांनाही नसते असे कित्येक वेळा निदर्शनास येते. त्यामुळे ‘आशीर्वाद, पुनर्मुद्रण, पुनर्वसन, श्रुती, श्रुतकीर्ती’ ह्यांसारखे शब्द अनेक वेळा ‘आर्शीवाद, पुर्नमुद्रण, पुर्नवसन, श्रृती, श्रृतकीर्ती’ असे चुकीचे लिहिले जातात.

ऱ्हस्व आणि दीर्घ ह्या शास्त्रीय संज्ञा असूनही शालेय आणि महाविद्यालयीन आयुष्यात कायम पहिली/पहिला आणि दुसरी/दुसरा अशा अ-शास्त्रीय संज्ञाच वापरल्यामुळे भाषा हा विषय घेऊन पदवीधर झालेली व्यक्तीसुद्धा शुद्धलेखनासंबंधी बोलताना ऱ्हस्व आणि दीर्घ ह्या व्याकरणिक संज्ञा वापरून बोलू शकत नाही. इतकेच काय, सुरुवातीला ह्या संज्ञांचा अर्थ समजून घेऊन त्या नीटपणे वापरण्यास तिला त्रास होतो असेही दिसते.

जोडाक्षरांच्या बाबतीतही शालेय अभ्यासक्रमात कायम आडव्या जोडणीचीच जोडाक्षरे वापरली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘क्त, क्व, त्त, द्ग, द्द, द्ध, द्भ, द्म, द्य, द्व, प्त, क्क्या, ट्ट्या, ठ्ठ्या, ड्ड्या, द्द्या, द्ध्या, ल्ल्या’ ही जोडाक्षरे फक्त ह्याच पद्धतीने माहीत असतात. प्रत्यक्ष साहित्यात मात्र आडव्या जोडणीऐवजी उभी जोडणी वापरात असल्याने साहित्यात ही जोडाक्षरे ‘क्त, क्व, त्त, द्ग, द्द, द्ध, द्भ, द्म, द्य, द्व, प्त, क्क्या, ट्ट्या, ठ्ठ्या, ड्ड्या, द्द्या, द्ध्या, ल्ल्या’ ह्याप्रमाणे छापली जातात. त्यामुळे कित्येक वेळा विद्यार्थ्यांना हे साहित्य वाचताना अडखळायला होते. अवांतर वाचनाच्या गोडीवर ह्या अडखळण्याचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो. तरीही, आपली वैशिष्ट्यपूर्ण आणि सौंदर्ययुक्त अशी उभी जोडणी कोणत्याही इयत्तेत शिकवण्याची सोय आपल्या अभ्यासक्रमात नाही.

वाक्यरचनेच्या बाबतीतही एकूणच जनतेत बऱ्यापैकी अज्ञान आहे असे दिसते. विभक्तिप्रत्ययाचे वैशिष्ट्य, काळ आणि घटना, कर्ता आणि क्रिया, विशेषण आणि विशेष्य, क्रियाविशेषण आणि क्रिया, ग्रांथिक भाषा आणि बोली भाषा; ह्या बाबी वाक्यात कशा असल्या पाहिजेत ह्याकडे शिक्षणात विशेष लक्ष दिले जात नसल्यामुळे साहित्य आणि प्रसारमाध्यमे अशा दोन्ही ठिकाणी अयोग्य वाक्यरचना सापडत असतात. कित्येक विद्यार्थ्यांकडे चांगली कल्पनाशक्ती असूनही निबंध लिहिताना त्यांची वाक्यरचना गडगडलेली दिसते. हेच विद्यार्थी पुढे साहित्य आणि प्रसारमाध्यमे ह्या ठिकाणी जात असल्यामुळे तिथली परिस्थितीही सुखावह दिसत नाही. भाषेच्या बाबतीत आपला अभ्यासक्रम एकंदरीतच साहित्याधिष्ठित झाल्यामुळे व्याकरण आणि शुद्धलेखन ह्या गोष्टींकडे कमी लक्ष दिले जाते. परीक्षेतही ह्या दोन बाबींना विशेष महत्त्व नसल्यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हे सर्वच जण ह्या बाबींच्या अभ्यासाच्या बाबतीत उदासीन दिसतात.

भाषिक शुद्धतेचे अपेक्षित स्वरूप

मराठी साहित्य महामंडळाने घालून दिलेले आणि ज्यांना महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली असे मराठी शुद्धलेखनाचे 18 नियम आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर बाबी ह्यांचे अत्यंत तपशीलवार ज्ञान इयत्ता 109वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिले जाईल अशा दृष्टिकोनातून पाचवी ते दहावी ह्या इयत्तांच्या भाषिक अभ्यासक्रमाची आखणी केलेली असावी. महामंडळाच्या प्रचलित 18 नियमांमध्ये काही विसंगती, दोष आणि त्रुटी आहेत हे निश्चित. परंतु म्हणून हे नियम शिकवणे किंवा पाळणे ही अशक्य कोटीतील किंवा अत्यंत कठीण अशी बाब आहे असे मात्र नाही. त्यामुळे, जोपर्यंत हे नियम बदलले जात नाहीत तोपर्यंत ते शिकवायचे नाहीत हे धोरण हानिकारक ठरेल. हे नियम बदलण्याचा विचार महामंडळाने आत्तापर्यंत दोन-चार वेळा केला, परंतु प्रचलित नियमांमध्ये बदल करण्यासतकी योग्य परिस्थिती अजून आलेली नाही, असे निदर्शनास आल्यामुळे महामंडळाने कोणतेही बदल केले नाहीत, हेही लक्षात घेतले पाहिजे. हे नियम बदलायचे असतील, तर ह्यांतील विसंगती, दोष आणि त्रुटी ह्यांचा अभ्यासपूर्ण विचार झाला पाहिजे, त्याशिवाय केले जाणारे बदल परिणामकारक आणि दीर्घ काळ टिकणारे होणार नाहीत. परंतु हे 18 नियम संपूर्ण महाराष्ट्रात पूर्णपणे आणि तपशिलात शिकवण्याचा प्रयत्न गेल्या 40 वर्षांत कधीच केला गेला नसल्याने हे नियम शिकवताना आणि शिकताना येणाऱ्या अडचणी ह्यांची नीटशी जाणीवच शिकवणाऱ्यांना आणि शिकणाऱ्यांना झालेली नाही. अशा परिस्थितीत हे नियम बदलण्याचा प्रयत्न झाला तर होणारे नवे नियम वेगळ्याच प्रकारची विसंगती, दोष आणि त्रुटी घेऊन तयार होतील आणि मग परिस्थिती आत्तापेक्षाही बिकट होईल. त्यामुळे हे प्रचलित 18 नियम सार्वत्रिक पातळीवर पूर्णपणे आणि तपशिलात शिकवण्याचे प्रयत्न झाल्याशिवाय हे नियम बदलण्यासाठी आवश्‍यक असलेली योग्य परिस्थिती आपण निर्माण करू शकत नाही.

बालवयातील सर्व विद्यार्थ्यांना आपली शास्त्रीय स्वरमाला शिकवली जावी. ‘ऋ, रु, रू’ त्याचप्रमाणे ‘ङ्, ञ्‌, श्‌, ष्‌’ ह्या वर्णांचे योग्य उच्चार त्यांतील भिन्नतेसह बालवयातच नीट शिकवले जावेत.

आठवी ते दहावी ह्या इयत्तांमधील विद्यार्थी हे किशोरवयातील विद्यार्थी असतात. त्यांच्याजवळ भाषिक ज्ञानाची एक किमान बैठक तयार झालेली असते. त्या अनुषंगाने त्यांची बौद्धिक पातळी, ग्रहणशक्ती आणि जिज्ञासा ह्या गोष्टी अधिक प्रगत झालेल्या असतात. अवांतर वाचनाला साधारण ह्या वयापासून सुरुवात होते. हे विद्यार्थी शालेय शिक्षणाच्या अंतिम टप्प्यात आलेले असतात. शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेताना ते वेगवेगळ्या शाखांना जाणार असतात. भाषा ह्या विषयाशी त्यांच्यातील अनेकांचा शैक्षणिक पातळीवर संबंध राहणार नसतो. त्यामुळे आठवी ते दहावी ह्या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना आपल्या भाषेचे अधिक ज्ञान कसे होईल हे पाहिले जावे. ह्या इयत्तांमध्ये शिकवताना पहिली/पहिला किंवा दुसरी/दुसरा ह्या अ-शास्त्रीय संज्ञांऐवजी ऱ्हस्व-दीर्घ ह्या शास्त्रीय संज्ञा वापरल्या जाव्यात. त्यांच्या पाठ्यपुस्तकांमधील जोडाक्षरे बाहेरील साहित्यात असतात तशी उभ्या जोडणीने छापलेली असावीत, जेणेकरून त्यांना आपल्या लिपीतील ह्या वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्याची ओळख व्हावी. ह्या जोडाक्षरांचे लेखनही त्यांच्याकडून उभ्या जोडणीनेच करून घेतले जावे.

शिक्षणक्षेत्रात कोशवाङ्मयाला असलेले महत्त्व वेळीच लक्षात घेऊन ‘कोश कसा पाहावा’ ह्याचे शिक्षण आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दिले जावे. ह्या शिक्षणात त्यांना मराठीबरोबरच संस्कृत, हिंदी आणि इंग्लिश ह्या भाषांचेही कोश दाखवले जावेत. त्यामुळे त्यांना कोशवाङ्मयातील प्रगल्भ ज्ञान तर प्राप्त होईलच, पण कोश बघण्याची सवय लागल्याने आपली वर्णमालाही आपोआप पाठ राहील.

एकंदरीतच, आठवी ते दहावी ह्या इयत्तांच्या भाषिक अभ्यासक्रमात साहित्याबरोबरच व्याकरण, शुद्धलेखन, वाक्यरचना, कोशवाङ्मय ह्यांनाही बरोबरीचे स्थान असावे. प्रश्नपत्रिकेतील गुणांमध्येही त्यांना बरोबरीचे स्थान असावे. दैवयोगाने लाभलेल्या प्रतिभेला आणि कल्पनाशक्तीला भाषेच्या समृद्ध पायाची बैठक लाभली, तरच साहित्यातील भाषा ओघवती होऊ शकते, आणि दर्जेदार कोशवाङ्मयाची निर्मिती होऊ शकते.

अपेक्षापूर्तीसाठी सेतूची आवश्‍यकता

आपला सदोष अभ्यासक्रम ह्या गोष्टींना किंवा ह्या परिस्थितीला कारणीभूत असला, तरी ह्या परिस्थितीत काही सुधारणा घडवून आणायची असेल, तर कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय संस्थेवर अवलंबून न राहता शिक्षक आणि पालक ह्यांनी शाळेच्या माध्यमातून एकत्र येऊन काही प्रयत्न करण्याची तयारी दाखवल्यास ही परिस्थिती सहज बदलता येईल. मराठी शुद्धलेखनाचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात करणे हे काही दोन-चार व्यक्तींकडून होणारे काम नाही. त्यामुळे प्रत्येक शहरातील जे शिक्षक आणि पालक शुद्धलेखन ह्या विषयात काही करू शकतात आणि त्यासाठी थोडा वेळ देऊ शकतात त्यांनी एकत्र येऊन ‘मित्र मराठी शुद्धलेखनाचे’ ह्या किंवा अशा एखाद्या समर्पक नावाने एक मंच स्थापन करावा. उद्दिष्टपूर्ती होईपर्यंत हा मंच केवळ मंचच राहावा. त्याचे संस्थेत रूपांतर करण्याचा विचार कधीही करू नये. असे म्हणण्याचे कारण असे की, ‘संस्थे’च्या बाकीच्या ‘घोळा’त किंवा खटाटोपात शिरायला गेल्यावर मुख्य उद्दिष्ट बाजूला राहील. प्रथम आपल्या शहरातील आणि त्यानंतर जमल्यास आणि गरज असल्यास शेजारच्या शहरांतील शिक्षक, पालक आणि विद्यार्थी ह्यांमध्ये ‘मराठी शुद्धलेखनाचा प्रसार करणे’ एवढेच ह्या मंचाचे एकमेव उद्दिष्ट असले पाहिजे. इतर कोणतेही उपक्रम त्याबरोबरच सुरू करण्याचा मोह टाळावा आणि मुख्य उद्दिष्टापासून मंच दूर जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी. कोणतेही शिक्षण जेव्हा विनामूल्य द्यावे लागते तेव्हा ते देणाऱ्या व्यक्तीकडून मनापासून दिले जाईलच असे नाही, त्याचप्रमाणे जेव्हा ते विनामूल्य मिळते तेव्हा ते घेणाऱ्या व्यक्तीकडूनही मनापासून घेतले जाईलच असे नाही. त्यामुळे, अवाजवी नफा मिळवणे गैर असले, तरी आवश्‍यक तेवढे शुल्क आकारण्यात काहीच गैर नाही.

ह्या मंचात ज्या व्यक्ती सहभागी होतील त्यांच्यापैकीच काहींना मराठी शुद्धलेखनाचे चांगले ज्ञान असेल तर उत्तमच. मग त्यांनी इतरांना शुद्धलेखनाच्या ज्ञानाबरोबरच शुद्धलेखन कसे शिकवावे ह्याचेही ज्ञान द्यावे आणि त्यातून हे शिक्षण देणारा एक चमू तयार व्हावा. मग त्या चमूने त्या शहरात ठिकठिकाणी शुद्धलेखनाचे अभ्यासवर्ग भरवावेत. पहिल्यांदा ह्या चमूच्या प्रशिक्षणाला एक महिन्याचा कालावधी भरपूर होईल, आणि नंतर ह्या चमू रोज दोन तास ह्याप्रमाणे प्रत्येकी दहा दिवसांचा एक अभ्यासवर्ग भरवेल. ह्या शिक्षणासाठी विशिष्ट पद्धतीने तक्त्यांचा वापर केल्यास दृक्‌-श्राव्य माध्यमाचा परिणाम साधून हे शिक्षण प्रभावी आणि रंजक होते असा माझा अनुभव आहे. मंचातील व्यक्ती9ंपैकी कोणालाच शुद्धलेखनाचे पुरेसे ज्ञान नसेल, तर शहरातील जाणकार व्यक्तीकडून त्यांनी हे ज्ञान घ्यावे. तेही शक्य नसेल, तर शुद्धलेखनाच्या पुस्तकांचा एकत्रित अभ्यास करून हा छोटासा शिक्षणक्रम तयार करावा. तेही शक्य नसेल, तर परगावाहून जाणकार व्यक्तीला अल्पावधीसाठी पाचारण करावे.

ह्यासाठी आवश्‍यक असणारी काही पुस्तके पुढीलप्रमाणे- 1)99शुद्धलेखन-विवेक; द. न. गोखले; सोऽहम्‌ प्रकाशन, पुणे; पृष्ठे 192; 90 रुपये. 2)99मराठी शुद्धलेखन प्रदीप; मो. रा. वाळंबे, अरुण फडके; नितीन प्रकाशन, पुणे; पृष्ठे 216; 85 रुपये. 3)99मराठी लेखन मार्गदर्शिका; यास्मिन शेख; राज्य मराठी विकास संस्था, मुंबई; पृष्ठे 192; 75 रुपये.

शुद्धलेखनाचा अभ्यास करताना आणि शुद्धलेखन प्रत्यक्ष शिकवताना विशिष्ट नियमांच्या बाबतीत येणाऱ्या अडचणींची तसेच त्या वेळी सुचलेल्या उपायांची आणि उदाहरणांची नोंद करून ठेवावी. शुद्धलेखनाच्या प्रचलित नियमांमधील विसंगती, दोष आणि त्रुटी दूर करून नवी नियमावली अधिक सुसंगत, सुलभ आणि परिपूर्ण करण्यासाठी ह्या नोंदी फार मोलाचे काम करतील.

हा उपक्रम म्हणजे एक अतिआदर्श कल्पना आहे असे सुरुवातीला वाटले, तरी मनापासून प्रयत्न केल्यास एखाद-दोन महिन्यांतच असा एक चमू प्रत्यक्षच तयार झालेला दिसेल.

सुरुवातीला ह्या चमूने फक्त प्रचलित नियमांनुसार शुद्धलेखन, आणि आपल्या वर्णमालेतील वर्णांचे योग्य उच्चार ह्या दोनच बाबींवर लक्ष केंद्रित करावे. ह्या गोष्टी यशस्वी होत आहेत असे दिसल्यावर अभ्यासवर्गाचा कालावधी वाढवून मग जोडाक्षरांच्या उभ्या जोडणीची वैशिष्ट्यपूर्ण आणि सौंदर्ययुक्त लेखनपद्धती, मराठी वाक्यरचनेची वैशिष्ट्ये, आणि कोश कसा पाहावा; ह्या बाबींचेही शिक्षण देण्यास सुरुवात करावी.

कोणत्याही भाषेमध्ये ज्या गतीने विविध विषयांतील वैविध्यपूर्ण आणि कसदार कोशवाङ्मयाची निर्मिती होत असते, त्याच गतीच्या प्रमाणात भाषेच्या विकासाची गती असते. मराठीतील कोशवाङ्मय पाहिले तर असे दिसते की, एकदा एक कोश तयार झाल्यावर पुढील 25 वर्षे किंवा त्याहीपेक्षा अधिक काळ त्याच कोशाचे केवळ पुनर्मुद्रण होत असते. प्रत्येक आवृत्ती ही सुधारित आणि विस्तारित आवृत्ती म्हणून निघत नाही. कोशवाङ्मयाच्या शिक्षणाचा अभाव असल्यामुळे आपल्याकडे कोशवाङ्मयातील विविध दृष्टिकोन रुजलेले नाहीत. म्हणूनच शालेय शिक्षणात कोशवाङ्मयाची तोंडओळख करून दिली गेली पाहिजे; आणि पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमात कोशवाङ्मयाचे ज्ञान अर्थात्मक, रचनात्मक, तुलनात्मक आणि उपयोजनात्मक पातळ्यांवर तपशीलवार दिले गेले पाहिजे. त्याशिवाय भावी ‘कोशकार’ तयार होणार नाहीत.

इंग्लिश भाषिकांनी त्यांच्या भाषेसाठी करून ठेवलेल्या प्रचंड कामाचे तोंड भरून कौतुक जरूर करावे, पण त्याच वेळी आपणही आपल्या भाषेत त्यासारखेच, किंबहुना त्यापेक्षाही अधिक मोलाचे काम करून दाखवण्याची जिद्दही बाळगावी. तशा प्रकारचे काम आपल्याकडून कधीही होणार नाही असे मानणे किंवा अशी कबुली देणे म्हणजे स्वतःला अतिशय कमी लेखण्यासारखे आहे. त्याचबरोबर, आपल्या भाषेसाठी एवढे काम करण्यात वेळ घालवण्यापेक्षा परभाषेचा स्वीकार करणे अधिक सोपे, अशी भूमिका ठेवणे म्हणजेही स्वतःतील स्वाभिमानशून्यतेचा आणि नाकर्तेपणाचा खुशाल स्वीकार करण्यासारखे आहे. फ्रेंच आणि हिब्रू ह्या दोन भाषिकांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही आपापल्या भाषांचा जीर्णोद्धार हिरिरीने केला असे म्हणतात. त्या तुलनेत आपली मराठी तर प्रगतिपथावर आणि अनुकूल परिस्थितीत आहे. त्यामुळे बेफिकीर राहून प्रतिकूल परिस्थिती ओढवून घेण्यापेक्षा अनुकूल परिस्थितीचा लाभ घेऊन वेळीच भाषेचा विकास करणे केव्हाही शहाणपणाचे ठरेल.

माझ्या ह्या लेखातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यांमध्ये जरी ‘मित्र मराठी शुद्धलेखनाचे’ ह्या मंचाची स्थापना झाली, तरीही माझ्या ह्या लेखातून काहीतरी साध्य झाल्याचे समाधान मला मिळेल.

खरे तर कोणत्याही भाषेचा विकास हा त्या भाषेच्या केवळ अभ्यासाने होत नसतो. त्या विकासाला हातभार लावण्यासाठी त्या भाषिकांनी ती भाषा सतत बोलणे गरजेचे असते. मराठी ही मातृभाषा असलेल्या लोकांची संख्या आजमितीस साधारण आठ कोटी एवढी आहे. एवढ्या मोठ्या जनतेने बोलणे, वाचणे आणि लिहिणे हे आपले दैनंदिन व्यवहार शक्य होतील तेवढे शुद्ध मराठीतच करण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले तर मराठीचा विकास आश्चर्यकारक गतीने होत आहे असे दिसून येईल. मात्र त्यासाठी आपली संस्कृती जपणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. ह्यांविषयी खरे तर खूप काही सांगता येईल, पण विस्तारभयास्तव इथे अधिक काही न सांगता कुसुमाग्रजांच्या एका कवितेतील चार ओळी उद्धृत करून हा लेखनप्रपंच इथेच थांबवतो.

पर भाषेतही व्हा पारंगत, ज्ञानसाधना करा तरी।
माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका॥
भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे।
गुलाम भाषिक होउनि अपुल्या, प्रगतीचे शिर कापु नका॥
कुसुमाग्रज

अरुण फडके, संपादक : मराठी लेखन-कोश
ठाणे, 26-08-2004


← Previous Post Next Post