मराठी अकारविल्हे

प्रचलित अशास्त्रीय, आणि अपेक्षित शास्त्रीय

लेखक अरुण फडके, दिनांक September 06, 2015 · 3 mins read

मराठी अकारविल्हे

प्रचलित अशास्त्रीय, आणि अपेक्षित शास्त्रीय

लेखाच्या मथळ्यात म्हटल्याप्रमाणे प्रचलित मराठी अकारविल्हे पद्धत अशास्त्रीय आहे हे सिद्ध करून अपेक्षित शास्त्रीय पद्धतीची सिद्धता मांडणे हा ह्या लेखाचा उद्देश आहे.

दिनांक ६ नोव्हेंबर २००९ रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या वर्णमाला आदेशानुसार मराठी वर्णमालेत आता १४ स्वर, २ स्वरादी आणि ३४ व्यंजने असे एकूण ५० वर्ण आहेत. ह्या ५० वर्णांचा शास्त्रीय क्रम पुढीलप्रमाणे आहे-

स्वर-

अ आ इ ई उ ऊ ऋ लृ
ए अ‍ॅ ऐ ओ ऑ औ

स्वरादी-

अनुस्वार आणि विसर्ग

व्यंजने-

क ख ग घ ङ; च छ ज झ ञ;
ट ठ ड ढ ण; त थ द ध न;
प फ ब भ म; य र ल व;
श ष स; ह ळ

‘अकार’ म्हणजे ‘अ’ हे अक्षर आणि ‘विल्हे’ म्हणजे क्रम. म्हणून ‘अ’ ह्या अक्षरापासून लावलेल्या शब्दांच्या क्रमाला ‘अकारविल्हे’ म्हणतात. असा क्रम लावताना प्रत्येक अक्षरानंतर वर्णमालेतील स्वर, स्वरादी आणि व्यंजने हा क्रम पाळायचा असतो. प्रचलित अकारविल्हे पद्धतीनसुार पुढील शब्दक्रम असा येतो-

कई, कंगवा, कःपदार्थ, कम, कमंडलू, कमोद, कर, करंगळी, करवंटी, करवीर, करोटी, कळ, काऊ, कांदा, कास, कासंडी, कासे, काहूर, किंमत, किसणी, कीस, कुई, कुंदा, कुहू, कूळ, कृष्ण, क्लृप्ती, केंद्र, केळे, कैवार, कोंदण, कोल, कोलांटी, कोलीत, कोळसा, कौशल्य, क्रम, क्वचित.

वर दाखवलेल्या वर्णमालेचा क्रम शास्त्रीय असला, तरी हा अकारविल्हे क्रम मात्र त्या वर्णमालेनुसार नसल्यामुळे अशास्त्रीय ठरतो असे सिद्ध करायचे आहे आणि नंतर शास्त्रीय वर्णमालेनुसार हा अकारविल्हे क्रम शास्त्रीय पद्धतीने लावून दाखवायचा आहे. त्यासाठी आपण वर्णमालेतल्या अनुस्वार आणि विसर्ग ह्या स्वरादींचा पूर्ण विस्तार करून ही वर्णमाला पुन्हा मांडू-

स्वर-

अ आ इ ई उ ऊ ऋ लृ
ए अ‍ॅ ऐ ओ ऑ औ

स्वरादी (अनुस्वार)-

अं आं इं ईं उं ऊं ऋं लृं
एं अँ ऐं ओं आँ औं

स्वरादी (विसर्ग)-

अः आः इः ईः उः ऊः ऋः लृः
एः अ‍ॅः ऐः ओः ऑः औः

व्यंजने-

क ख ग घ ङ; च छ ज झ ञ;
ट ठ ड ढ ण; त थ द ध न;
प फ ब भ म; य र ल व;
श ष स; ह ळ

ही विस्तारित वर्णमाला पाहिल्यावर शास्त्रीय क्रम असा दिसतो की, अ-औ ह्या १४ स्वरांनंतर अं-औं हे अनुस्वाराचे १४ स्वरादी येतात, नंतर अः-औः हे विसर्गाचे १४ स्वरादी येतात, आणि नंतर क-ळ ही ३४ व्यंजने येतात.

आता ह्या विस्तारित वर्णमालेतले अ-औ हे १४ स्वर, अं-औं हे अनुस्वराचे १४ स्वरादी आणि अः-औः हे विसर्गाचे १४ स्वरादी ‘क’ ह्या व्यंजनात मिसळले, तर ‘क’ची शास्त्रीय वर्णमाला पुढीलप्रमाणे होईल-

क, का, कि, की, कु, कू, कृ, क्लृ,
के, कॅ, कै, को, कॉ, कौ
कं, कां, किं, कीं, कुं, कूं, कृं, क्लृं,
कें, कँ, कैं, कों, काँ, कौं
कः, काः, किः, कीः, कुः, कूः, कृः, क्लृः
केः, कॅः, कैः, कोः, कॉः, कौः

क-ची ही शास्त्रीय वर्णमाला पाहिल्यावर असे दिसते की, प्रथम क-कौ ह्या १४ अक्षरांनी सुरू होणारे शब्द येतील, औकारानंतर कं-कौं ह्या अनुस्वारयुक्त १४ अक्षरांनी सुरू होणारे शब्द येतील, अनुस्वारयुक्त औकरानंतर कः-कौः ह्या विसर्गयुक्त १४ अक्षरांनी सुरू होणारे शब्द येतील आणि विसर्गयुक्त औकारानंतर जोडाक्षरयुक्त शब्दांची सुरुवात होईल. प्रत्येक शब्दाच्या पहिल्या अक्षरानंतर स्वर, स्वरादी, व्यंजन हा शास्त्रीय क्रम पाळला जाईल.

कई कंगवा कःपदार्थ कम कमंडलू कमोद कर करंगळी करवंटी करवीर करोटी कळ काऊ कांदा कास कासंडी कासे काहूर किंमत किसणी कीस कुई कुंदा कुहू कूळ कृष्ण क्लृप्ती केंद्र केळे कैवार कोंदण कोल कोलांटी कोलीत कोळसा कौशल्य क्रम क्वचित

अरुण फडके
५ सप्टेंबर २०१५


← Previous Post