शालेय शिक्षण : मो. ह. विद्यालय ठाणे येथे ११ वी मॅट्रीक, १९७१
महाविद्यालयीन शिक्षण : मुद्रण तंत्रज्ञान या विषयातली ३ वर्षांच्या अभ्यासक्रमाची पदविका उत्तम गुणवत्तेने संपादन केली, १९७७
व्यवसाय : पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर १९७७पासून अरुणोदय छापखाना हा वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. कंपोझिंग किंवा अक्षरजुळणी ह्या विभागात विशेष रस असल्यामुळे त्या विभागात अनेक अभिनव प्रयोग केले.
१९८७ साली जुना छापखाना बंद करून अक्षय फोटोटाइपसेटर्स हा संगणकीय अक्षरजुळणीचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय सुरू केल्यावर पानाची बांधणी करतान खिळे-जुळणीत शक्य नसलेल्या गोष्टी करता येतात हे लक्षात आले. पुस्तक कसे असावे, कोणत्या पानावर काय घ्यावे, त्याचे पान कसे बांधावे ह्या गोष्टी अनुभवातून शिकता आल्या. पान बांधणे किंवा पेजिंग कसे करावे ह्याची नेटकी पद्धत अक्षय फोटोटाइपसेटर्सचे वैशिष्ट्य ठरली. पानाची उंची, पानाचा फोलिओ, प्रकरणाचा मथळा, प्रकरणांमधील उप-शीर्षके आणि चित्रे ह्यांची रचना का आणि कशी करायची ह्याचा सूत्रबद्ध अभ्यास अरुण फडके ह्यांनी केला होता आणि त्या अभ्यासाचे फलित होते अक्षय फोटोटाइपसेटर्समध्ये अक्षरजुळणी झालेल्या पुस्तकांचे नेटकेपण आणि वेगळेपण.
अक्षरजुळणी करताना मुद्रणाचे मापन ज्या मोजपट्टीने करतात त्या पायका एककाचा वापर सगळ्यांनी करायला हवा, असे अरुण फडके ह्यांना वाटे. पण त्यांच्या ह्या आग्रहासाठी त्यांच्याच क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांची हेटाळणी केल्यावर त्यांना खूप वाईट वाटले. खरे तर अक्षय फोटोटाइपसेटर्सचे नेटकेपण आणि वेगळेपण पायका एककाच्या वापरामुळेच शक्य झाले होते.
संगणकीय अक्षरजुळणीमध्ये पंचांग तयार करणे हे त्या वेळी मोठे आव्हान होते. केशव भिकाजी ढवळे ह्या संस्थेच्या श्री. धनंजय ढवळे ह्यांनी जेव्हा त्यांना पंचांग कराल का असे विचारले, तेव्हा अरुण फडके ह्यांनी ते आव्हान स्वीकारले आणि यशस्वीपणे पार पाडले. अतिशय नेटक्या स्वरूपातले पंचांग जेव्हा श्री. ढवळे ह्यांनी पाहिले तेव्हा त्यांनी अरुण फडके ह्यांचे मनापासून कौतुक केले.
पंचांगाचे मुद्रण मौजेच्या छापखान्यात झाले, त्या वेळी मौजेच्या श्री. श्री. पू. भागवत ह्यांनी त्यांच्याकडे आलेल्या एका किचकट पुस्तकाची अक्षरजुळणी कराल का, असे विचारले. ते पुस्तक होते श्री. कुमार गंधर्व ह्यांचे अनुपरागविलास! ह्या पुस्तकात संगीत नोटेशन्स होती आणि त्या वेळी संगीत नोटेशन्सचा फाँट नव्हता. अरुण फडके ह्यांनी संगीत नोटेशन्सचा फाँट उपलब्ध नसतानाही उपलब्ध फॉन्ट्सच्या मदतीने त्या पुस्तकाची संगणकीय अक्षरजुळणी यशस्वी केली आणि कुमार गंधर्व ह्यांच्या पत्नीकडून शाबासकी मिळवली.
यंत्रालयाचा ज्ञानकोश हेही एक असेच मोठे आणि आव्हानात्मक काम होते. अनेक चित्रे, तक्ते ह्यांचा सढळ वापर त्या कोशात केला होता. त्या सगळ्यांचा ताळमेळ घालून पानाच्या ठरलेल्या उंचीत आणि रुंदीत ते पान बसवणे हे खरे आव्हान होते. ते आव्हानही अरुण फडके ह्यांनी यशस्वीरीत्या पेलले आणि कोशकार भिडे आणि प्रकाशक राज्य मराठी विकास संस्थेच्या तत्कालीन संचालक श्रीमती सरोजिनी वैद्य ह्यांच्याकडून समाधानाची पावती मिळवली.
अनेक प्रकारची, अनेक लेखकांची आणि अनेक प्रकाशकांची पुस्तके करताकरताच अरुण फडके ह्यांना मुद्रितशोधन करावे लागले आणि मग पुढे तो त्यांचा अभ्यासाचा विषयच झाला.
मुद्रितशोधन : मुद्रणाचा वडिलोपार्जित व्यवसाय असल्यामुळे मुद्रितशोधन म्हणजे काय ह्याची तोंडओळख झाली. शालेय जीवनात भाषेचा अभ्यास करण्याची आवड होती आणि त्या आवडीचे रूपांतर मुद्रितशोधनात झाले. मुद्रितशोधन करताना अनेक प्रश्न त्यांना भेडसावत होते. विशेषतः ऱ्हस्व, दीर्घ, सामान्यरूप, जोडाक्षरे ह्यांच्या नियमांचा अभ्यास करून त्यांनी ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नातच त्यांनी शुद्धलेखनाच्या सगळ्या नियमांचा आणि अपवादांचाही अभ्यास केला. पण ह्या अभ्यासाला योग्य ती दाद मिळत नव्हती किंबहुना त्यांचा हा अभ्यास प्रथितयश व्यक्तींसाठी अडचणीचा होऊ लागला. मराठी भाषेतला हा अभ्यास, म्हणजे अरुण फडके ह्यांना पडलेल्या प्रश्नांची अरुण फडके ह्यांनी अभ्यासपूर्वक शोधून काढलेली उत्तरे होती. ती उत्तरे म्हणजेच अरुण फडके ह्यांचा ‘मराठी लेखन-कोश’ !
मराठी शुद्धलेखनाचा अभ्यास आणि मराठी लेखन-कोश ह्या ग्रंथाचे लेखन-संपादन : संगणकीय अक्षरजुळणी म्हणजेच अक्षय फोटोटाईपसेटर्स ह्या व्यवसायाची सुरुवात केल्यावर पुस्तकांची अक्षरजुळणी करायचे काम मिळत गेले. त्या पुस्तकांचे मुद्रितशोधन करताना शुद्धलेखनाच्या अनेक शंका भेडसावू लागल्या आणि त्यांची उत्तरे मिळवताना मराठी शुद्धलेखनाचा अभ्यास झाला. शुद्धलेखनाचा अभ्यास झाल्यावर कामासाठी आलेल्या अनेक पुस्तकांमध्ये प्रथितयश लेखकांकडून झालेल्या चुका निदर्शनास आल्या. त्या चुका काही वेळा स्वीकारून सुधारणा केल्या गेल्या पण बहुतांश वेळेला त्या चुका दुरुस्त करण्यास नकार देण्यात आला. काही वेळा तर अरुण फडके शुद्धलेखनाचा आग्रह धरतात म्हणून त्यांच्याकडे कामच द्यायचे नाही असा सूर दिसला. आपले म्हणणे आपल्याला हव्या त्या पद्धतीने मांडायचे असेल, तर ते आपण आपल्याच पुस्तकातून का मांडू नये; असा एक विचार मनात आला आणि मग ‘मराठी लेखन-कोश’ ह्या प्रकल्पाला सुरुवात झाली. जवळजवळ चार वर्षांचे परिश्रम आणि अभ्यास यांतून ‘मराठी लेखन-कोश’ ह्या ग्रंथाची निर्मिती झाली. केशव भिकाजी ढवळे ह्या संस्थेने १ जानेवारी २००१ रोजी ह्या कोशाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली आणि त्यानंतर ‘शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे’ हे ब्रीदवक्य घेऊन ‘अंकुर प्रकाशन, ठाणे’ ह्या घरच्याच प्रकाशन संस्थेमार्फत त्या कोशाच्या आवृत्त्या प्रकाशित केल्या. ६ जानेवारी २०२० रोजी त्याची विस्तारित आणि सुधारित दहावी आवृत्ती प्रसिद्ध झाली.
मराठी लेखन-कोश प्रसिद्ध झाल्यानंतर श्रीलिपीची जनक संस्था मॉड्युलर इन्फोटेक ह्या कंपनीने अरुण फडके ह्यांना मराठी स्पेलचेकर ह्या त्यांच्या प्रकल्पात सहभागी करून घेतले आणि मराठीतला पहिला स्वयंचलित पद्धतीने चालणारा लेखन तपासनीस (स्पेलचेकर) करण्यात यश मिळाले. मराठी भाषेत सामान्यरूपे आणि क्रियापदांची रूपे स्वयंचलित पद्धतीने तयार करणे हे आव्हान होते, पण ते आव्हान अरुण फडके ह्यांनी पेलले आणि यशस्वी करून दाखवले असे म्हणता येईल.
मराठी लेखन-कोश आणि मराठी लेखन तपासनीस (स्पेलचेकर) यांसाठी अभ्यास करत असताना मराठी शुद्धलेखनाच्या नियमांचा त्यांतल्या बारकाव्यांचा, अपवादांचा सखोल अभ्यास झाला आणि मग ते नियम सुसंगतपणे मांडणे, त्या नियमांबाहेरचे शब्द कसे लिहावेत, वर्णमाला आणि शुद्धलेखन ह्यांचा संबंध, जोडाक्षरांचे लेखन, अनुस्वाराचे नियम, सामान्यरूपे, संधी, साधित शब्द, विरामचिन्हे ह्यांबद्दलचे सुटसुटीत आणि नेटके विवेचन करणारे ‘शुद्धलेखन मार्गप्रदीप’ हे पुस्तक ९ जून २००७ रोजी प्रसिद्ध केले. आज त्याची पाचवी आवृत्ती उपलब्ध आहे. ह्या पुस्तकाचा वापर सर्व वयोगटांतले अभ्यासक करतात हे विशेष. अगदी शाळेपासून महाविद्यालयापर्यंतचे अनेक विद्यार्थी आणि शिक्षक ह्या पुस्तकाचा वापर करतात. अरुण फडके यांना शंका विचारण्यासाठी येणाऱ्या दूरध्वनींवरून हे अनेक वेळा प्रत्ययास आले आहे.
‘शुद्धलेखन ठेवा खिशात’ ह्या अभिनव प्रयोगाला मराठी भाषा प्रेमींनी उदंड प्रतिसाद दिला. ह्याची पहिली आवृत्ती २३ सप्टेंबर २००६ रोजी प्रकाशित झाली. अंदाजे ११००० शब्दसंख्या असलेला आणि खिशात मावणाऱ्या आकारातला हा ठेवा अल्पकिमतीत उपलब्ध केल्यामुळे अनेकांनी त्याचा प्रचार आणि प्रसार केला. आज ह्या पुस्तकाची नवीव आवृत्ती सुरू आहे.
‘शुद्धलेखन ठेवा खिशात’ ह्या यशस्वी प्रयोगानंतर मराठीतले पहिले शुद्धलेखन ॲप त्याच नावाने काढायचे ठरले आणि मराठीसह इतर भारतीय भाषांसाठी प्रसिद्ध असलेल्या श्रीलिपी ह्या सॉफ्टवेअरची निर्मिती करणाऱ्या मॉड्युलर इंफोटेक ह्या कंपनीच्या तंत्र सहकाराने ‘शुद्धलेखन ठेवा खिशात’ हे ॲप जुलै २०१७मध्ये प्रकाशित झाले.
शाळेतल्या मुलांना शुद्धलेखन कसे शिकवायचे, ही समस्या जेव्हा शाळेतल्या काही शिक्षकांनी अरुण फडके ह्यांच्यासमोर मांडली, तेव्हा ते थोडेसे अंतर्मुख झाले आणि त्यांनी ‘सोपे मराठी शुद्धलेखन’ ह्या पुस्तकाची निर्मिती केली. हे पुस्तक ६ जानेवारी २००५ रोजी प्रसिद्ध झाले. ह्या पुस्तकालाही उदंड प्रतिसाद मिळाला. ह्यांची अकरावी आवृत्ती ६ जानेवारी २०१६ रोजी प्रकाशित झाली. ह्या पुस्तकाच्या आधारे लहान मुले कोणत्याही नियमात न शिरता शब्द बिनचूक लिहू शकतील अशा पद्धतीने ह्या पुस्तकाची मांडणी केली आहे.
मराठी भाषेचा प्रचार व्हावा आणि अमराठी मुलांनाही मराठी सुलभ रितीने शिकता यावे म्हणून अरुण फडके ह्यांनी ‘मला मराठी शिकायचंय’ हे पुस्तक लिहून प्रसिद्ध केले. ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती ८ जुलै २०१० रोजी प्रकाशित झाली. अनेक शाळांनी ते पुस्तक मुलांच्या अवांतर अभ्यासासाठी म्हणून लावले. मुळाक्षरापासून जोडाक्षरापर्यंत टप्प्याटप्प्याने मराठी शिकवणाऱ्या ह्या पुस्तकाचा अनेकांनी पुरस्कार केला. ह्या पुस्तकाची चौथी आवृत्ती २६ जुलै २०१७ रोजी प्रकाशित झाली आहे.
मराठी भाषा आणि तिचे शुद्धलेखन ह्या दोन गोष्टींचा प्रसार आणि प्रचार हे अरुण फडके यांचे ध्येयच बनले आणि मग त्यांनी शुद्धलेखन ह्या विषयावर निरनिराळ्या कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून त्यांच्याकडे कार्यशाळेसाठी विचारणा होऊ लागल्या आणि मग शुद्धलेखन कार्यशाळा हा अरुण फडके ह्यांच्या आयुष्याचा एक भागच झाल्या. ह्या निमित्ताने त्यांच्या अनेक संस्था, व्यक्ती आणि विद्यार्थी ह्यांच्याशी ओळखी झाल्या. ह्या कार्यशाळेचा भाग असणारे एक सत्र होते ‘चकवा शब्दांचा… मैत्री शुद्धलेखनाशी’. ह्या सत्रात अरुण फडके नित्यवापरातल्या अनेक शब्दांचे योग्य लेखन आणि ते तसेच योग्य का आहे, हे तक्त्यांच्या मदतीने समजावून सांगत. त्यांतले एकएक शब्द जेव्हा श्रोते पाहत, तेव्हा ते चकित होत आणि आपल्या शुद्धलेखनाबाबतच्या गैरसमजांबद्दलची कबुली फडके ह्यांच्याकडे देत असत.
‘महाराष्ट्रात मराठीचा वापर झालाच पाहिजे’ हे ब्रीदवाक्य घेऊन अरुण फडके ह्यांनी १९८१ साली ‘प्रतियोगी’ ह्या साप्ताहिकाचा दिवाळी अंक प्रसिद्ध केला होता. त्या अंकात ठाण्यातल्या मान्यवरांचे लेख होते. त्या लेखांतूनच अरुण फडके ह्यांना मराठीवरील प्रेमाची प्रेरणा मिळाली असावी असे आता वाटते.
अरुण फडके ह्यांच्याकडे छपाईचा व्यवसाय वंशपरंपरेने आला होता. त्यांचे पणजोबा म्हणजेच काशीनाथ विष्णू फडके ह्यांनी ठाण्यातला पहिला छापखाना १८६५ साली ‘अरुणोदय छापखाना’ ह्या नावाने सुरू केला होता. तोच छापखाना अरुण फडके ह्यांचे आजोबा धोंडो काशीनाथ फडके आणि वडील गोपाळ धोंडो फडके ह्यांनी आणि त्यानंतर अरुण फडके आणि त्यांचे बंधू दीपक फडके ह्यांनी अव्याहत १२१ वर्षे सुरू ठेवला. ह्या छापखान्याच्या जोडीला काशीनाथ विष्णू फडके आणि धोंडो काशीनाथ फडके ह्यांनी ‘अरुणोदय’ आणि ‘हिंदु पंच’ ही दोन साप्ताहिके चालवली. ही साप्तहिके जहाल विचारसरणीची होती असे म्हटले जाते. मराठी वृत्तपत्रांमध्ये व्यंगचित्रे देण्याची प्रथा ‘हिंदु पंच’ ह्या साप्ताहिकाने केली असे म्हटले जाते. अरुण फडके ह्यांचे वडील गोपाळ धोंडो फडके ह्यांनी ‘प्रतियोगी’ हे साप्ताहिक जवळपास पंचवीस वर्षे चालवीले.